Tuesday, February 15, 2011

माहितीचे झाले मोकळे आकाश..

Sakaal, Friday, February 11, 2011 AT 12:00 AM (IST)
'विकिपीडिया'ने "गव्हर्न्मेंट-विकी' उपक्रम अलीकडेच सुरू केला आहे. सरकारचे निर्णय व योजना यांची माहिती त्याद्वारे खुली होत आहे. माहितीचा मुक्त प्रवाह शासनसंस्थेला अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

मानवजातीच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासमध्ये मानवाने जेवढे बदल पाहिले नसतील, तेवढे बदल आपण गेल्या १०-१५ वर्षांत पाहिले. त्यातला सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे माहिती मुक्त होणे. त्याने जगण्यात आमूलाग्र बदल घडविला; आपले नातेसंबंध, व्यवहार, मनोरंजनाच्या कल्पना सारेच बदलले. १९९० च्या पूर्वार्धात इंटरनेट सार्वजनिक वापरासाठी खुले केले गेले. जगातील सर्वांना आपल्याकडे असलेली माहिती इतर सर्वांना उपलब्ध करून देता यावी व जगात माहिती व ज्ञानाचा मुक्त व्यवहार असावा, ही त्यामागची भावना होती. त्याच सुमारास भारत मुक्त आर्थिक व्यवस्था स्वीकारून या बदलांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागला. या जाळ्याने माणसाच्या काही परंपरागत समजुतींना तडा दिला. या समजुती अशा होत्या : एक - ज्ञानासाठी तुम्हाला ग्रंथालये पालथी घालावी लागतात. दोन - ज्ञान हे सर्वांसाठी नाही- काही विशिष्ट समाजघटकांची ती मक्तेदारी आहे. तिसरे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्याकडे काही किमान पात्रता असावी लागते. "इंटरनेट'ला जात, धर्म, लिंग, वर्ण, गरीब-श्रीमंत असले कोणतेही अडथळे माहीत नाहीत. इंटरनेटच्या या आभासी दुनियेला कोणत्याही लोकशाहीला लाजवेल, असा मोकळेपणा, स्वातंत्र्य व लोकतंत्राचा भक्कम पाया आहे. याच तत्त्वांशी निष्ठा बाळगत जिमी वेल्स याने "विकिपीडिया' या मुक्त (आणि मुफ्त) ज्ञानकोशाची सुरवात केली. संपूर्णपणे लोकसहभागावर आधारित असलेल्या या ज्ञानकोशाने गेल्याच महिन्यात १० वर्षे पूर्ण केली. "माणसाला असलेली सर्व माहिती तुमच्या हाताच्या बोटांवर' हे या ज्ञानकोशाचे ब्रीदवाक्‍य आहे. आज या कोशात २८१ भाषांतील २.३ कोटी लेख आहेत. केवळ इंग्रजी भाषेतल्या लेखांची संख्याच ३.५ कोटी आहे. हे सर्व लेख लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांच्या मदतीने लिहिलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने "विकिपीडिया'वरील माहिती लोकशाहीवादी आहे. एखाद्या विषयावर जर लेखामध्ये बदल करायचा असेल, तर योग्य तोडगा निघेपर्यंत चर्चा केली जाते. अर्थात, तुम्ही लिहीत असलेल्या प्रत्येक माहितीला संदर्भ असणे अनिवार्य आहे. विकिपीडियाने नुकतेच गिकी (गव्हर्न्मेंट - विकी) नावाचा उपक्रम सुरू केला. आहे. याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, अंदाजपत्रके मुक्त चर्चेसाठी खुली करण्यात येत आहेत. शासनव्यवस्थेला पारदर्शी व उत्तरदायी बनवणे हा यामागचा उद्देश आहे. विकिपीडियाबरोबरच सध्या चर्चेत असलेला असाच माहितीचा साठा म्हणजे "विकिलिक्‍स' "विकी' हे नाव सोडल्यास या दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध नाही. हो, माहिती ही अभिजनांची मक्तेदारी नाही हे त्या दोन्हींमधले एकमेव साम्य. जर तुम्हाला एखादी माहिती काही अंतस्थ हेतूंनी जनतेपासून लपवली जाते आहे, असं लक्षात आलं तर ती तुम्ही इथे आणून देऊ शकता. ती माहिती "विकिलिक्‍स'कडे कशी आली याचा थांगपत्ता कोणालाही लागू दिला जात नाही- खुद्द "विकिलिक्‍स'लाही नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे. २००६ मध्ये जुलियन असान्जने याच पद्धतीने अनेक बलाढ्य राष्ट्रांची गुपिते विकिलिक्‍सच्या माध्यमातून लोकांसमोर आणायला सुरवात केली. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या अमानुष हल्ल्याच्या चित्रफितीने अमेरिकेलाही मान खाली घालायला लावली. बलाढ्य राष्ट्रे "विकिलिक्‍स'ने माहितीचा गैरवापर केला व राष्ट्रीय सुरक्षा धोक्‍यात आणली, असे ठणकावत आहेत, तर असान्ज हा नव्या युगाचा रॉबिनहूडच बनलेला आहे. विकिलिक्‍स असो वा विकिपीडिया किंवा बहुचर्चित फेसबुक, या सर्वांना बांधणारा एक प्रबळ विचार आहे- तो म्हणजे "माहितीला मुक्त असू द्या.' माहिती शक्तिशाली आहे आणि जेव्हा ती जनतेच्या हातात असते तेव्हा तिची शक्ती कैक पटीने वाढते. इंटरनेटच्या माध्यमातून कधीही नव्हता इतका माहितीचा साठा आपल्याला खुला आहे. जनतेला जागरूक करण्याचे काम ही माध्यमे करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेस धोकादायक म्हणून माहिती दाबून ठेवायचा प्रयत्न केला तरी ती बाहेर येणारच. या माहितीच्या महासागराला जनतेपासून लपवून ठेवणे आता शक्‍य नाही. किंबहुना जर राष्ट्रांनी याचा योग्य वापर केला तर त्याचा परिणाम लोकशाही बळकट करण्यासाठीच होऊ शकतो. इंटरनेटची निर्मितीच मुळात माहितीची मुक्त देवाण-घेवाण होण्यासाठी झाली, माहितीला एका जागी जखडून ठेवण्यासाठी नाही. हे जाळे आता नवीन आहे. लांबच्या प्रवासातली फक्त काही पाऊले आहेत. पुढचा प्रवास कसा होतो, हे आपली ही वीण किती बळकट आहे, त्यावर अवलंबून आहे. एकूणच लोकशाहीचा आशय अधिक रुंद-प्रशस्त करण्यासाठी मुक्त माहिती पर्वाचा परिमाणकारक उपयोग केला पाहिजे. जागरूक नागरिकशक्तीची जबाबदारी यासंदर्भात मोठी आ

Friday, February 11, 2011

गांधींच्या मृत्यूविषयी...


गांधींच्या हत्येनंतर महिन्याभरातच म्हणजे १९४८च्या मार्च महिन्यात गांधींचे सर्वात जवळचे सहकारी, नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सेवाग्राममध्ये भेटले. ह्यांमध्ये विनोबा भावे, क्रिपलानी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हे सर्व सेवाग्राममध्ये गांधीहत्येविषयी विचारविनिमय करण्यासाठी एकत्र जमले होते. भारतापुढे या नंतर येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा यासंदर्भात या मान्यवरांनी काही ठोस निर्णय घेतले. त्यानंतर ६० वर्षांनी सेवाग्राममधील त्या विचारविनिमयाला प्रतिक्रिया म्हणून काही विचारवंत, लेखक व अभ्यासक साबरमती आश्रमात जमले. ‘आजच्या भारतात ‘गांधींचा’ अभाव’ हा त्यांच्या चर्चेचा प्रमुख विषय होता. आजच्या तरुण पिढीच्या मनात मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तिमत्वाबद्दल काय आहे? आजचे तरुण नेते गांधींकडून प्रेरणा घेऊन लोकसहभागाच्या काही पद्धतींचा वापर करतांना दिसतात का? की त्यांना हे सर्व कालबाह्य वाटतं? या सर्व गोष्टी जाणून घेण्यात या विचारवंतांना रस होता.

गांधींबद्दल लिहिताना मी गांधीजी किंवा ‘महात्मा’ असं म्हणत नाही आहे. कारण ही सर्व बिरुदे आपल्याला त्या व्यक्तिमत्वापासून खूप दूर नेतात. एकदा का त्यांना संत-महात्मा म्हणून टाकलं की मग आपण ‘माणूस’ व्हायला मोकळे. आपण मग कधीच त्यांच्याशी नातं जोडू शकत नाही, प्रसंगी वादही घालू शकत नाही. गांधीही आपल्यासारखेच, आपल्यातलेच, निश्चितच असामान्य, पण माणूस होते. त्यांना असं फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवून आपण ‘गांधी’या शक्यतेचा बळी देत असतो.

खरंच, आजच्या जगाला गांधी, गांधीवाद किती लागू करता येऊ शकतो? आजचे किती तरुण नेते त्या दृष्टीने काम करतात?

आज आपल्याला गांधी भेटतात ते मुन्नाभाईच्या स्वप्नांमधून त्याला झपाटून टाकणाऱ्या एका केमिकल लोच्यामध्ये; सान सु कीच्या म्यानमारमधील लष्करशाही विरुद्ध लोकशाहीसाठीच्या अहिंसक लढ्यामध्ये. ‘गांधी हे माझे प्रेरणास्थान आहे, आज जो काही मी तुमच्यासमोर आहे, तो गांधी आणि त्यांच्या संदेशामुळेच’ अशा ओबामाच्या वक्तव्यामध्ये. भारतीय लष्कराच्या विशेषाधिकाराविरुद्ध आवाज उठवून गेली तब्बल ११ वर्षे उपोषण करणाऱ्या मणिपूरच्या इरोम शर्मिलामध्ये.

आज जागतिक हवामानातील बदलांबद्दल चर्चा सुरु असू दे नाहीतर जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल, गांधी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं सतत वाटत राहतं. गांधींचे सर्वार्थाने गाजलेले लेखन म्हणजे १९०९ मध्ये लिहिलेले ‘हिंद स्वराज’. या पुस्तकात त्यांनी आधुनिक संस्कृतीवर टीका केली आहे. ते असं म्हणतात की “जर भारताला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचे असेल तर भारतीय शिक्षणपद्धती, शासनव्यवस्था, विचारप्रणालीचा पाया बांधला पाहिजे. पण आपण जर परकीय पद्धतींचे अंधानुकरण केले तर भारत कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही”. जरी अभ्यासकांनी या लेखनाच्या व्यवहार्यतेबद्दल शंका निर्माण केली असली तरी ही टीका आपल्याला नक्कीच आजच्या समाजाबद्दल, परस्पर व्यवहारांबाबत विचार करायला लावते.

गांधींना १२५ वर्ष जगण्याची इच्छा होती. म्हणजे ते १९९४साला पर्यंत आपल्याबरोबर असते. असं खरंच झालं असतं, आणि काँग्रेसच्या नेत्यांनी गांधींचं म्हणणं ऐकलं असतं, तर आजचा भारत कसा असता? कदाचित नेहरुंनी आधुनिक भारताची मंदिरे वेगळ्या प्रकारे बांधली असती – आणि आपण खरे विद्यार्थी घडवले असते. कदाचित राजकारणातला भ्रष्टाचार कमी असता, आपली गावे सुदृढ होऊन शेतीतंत्रज्ञानात भारताने प्रगती केली असती आणि शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. पण गांधींनी १९९४ पर्यंत काय पहिलं असतं? इतर २ गांधींची हत्या, पाकिस्तान बरोबरची युद्धे, आणीबाणी, बोफोर्स, आर्थिक उदारीकरण... कसा सोडवला असता त्यांनी काश्मीर प्रश्न? काय झालं असतं जातीय आरक्षणाचं? माहित नाही. गांधीना आत्ताच्या भारतात नक्कीचं परकं वाटलं असतं. म्हणूनच ते गेले. म्हणूनच आपण त्यांना घालवलं.

अनेक लोक गांधींच्या मृत्यूनंतरची आठवण सांगतात. ज्या दिवशी गांधींच्या मृत्यूची – त्यांच्या हत्येची बातमी कळली, तेव्हा अख्या देशात एक विलक्षण नीरव शांतता पसरली होती. समर्थक-विरोधक सारेच स्तब्ध. प्रत्येक खेड्याला, प्रत्येक शहराला या भयाण-भीतीयुक्त शांततेनी ग्रासलं होत. कशाची होती ही शांतता? अपराधीपणाची? भीतीची? काहीतरी खूप महत्वाचं अचानक हरवल्याची? पोरकेपणाची? वैचारिक अनिश्चिततेची? कशाची? इतिहासाने या घटनेची नोंद घेतली आहे का? अख्खे राष्ट्र शांत–स्तब्ध. का झालं असेल असं?

तेव्हा निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आपण आजही करत आहोत.

लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरच्या बगीच्यामध्ये बरीच लोकं विविध विषयांवर निषेध नोंदविण्यासाठी गेलं वर्षभर आपला तळ ठोकून बसली आहेत. काहींना ब्रिटीश आर्थिक धोरण मान्य नाही, तर काही लोक ब्रिटनने अफगाणिस्तानातून आपले सैन्य परत फिरवावे यासाठी शांततामय निषेध नोंदवत आहेत. या सर्व विरोधकांच्या मागे, त्यांचं संघटन दाखवणारं गांधींचं एक वाक्य झळकत आहे. ‘बी द चेंज यु वॉन्ट टू सी इन थिस वल्ड’. आजही गांधी, आपल्या मृत्यूच्या ६३ वर्षांनंतरही ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिलेले दिसत आहेत.

३० जानेवारी या त्यांच्या पुण्यतिथीला अनेक समारंभ होतील, राजघाटवर भजने गायली जातील, फुले वाहिली जातील, लहान मुले शाळेत निबंधही लिहितील. या भजने, निबंध, समारंभात आपण त्यामागच्या व्यक्तीला विसरत चाललो आहोत. आज माहिती अधिकारासारख्या चळवळीतून, इरोम शर्मिलाच्या उपोषणातून, गांधी आपल्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्न करत आहेत; ते ऐकण्याचं बळ मात्र आज आपल्यात नाही असं वाटत राहतं.