मी काल माझ्या एका सॉफ़्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मित्राशी बोलत असताना तो म्हणाला... मला बाबा मराठी वृत्तपत्रे-मासिके हातात घेववत नाहीत. मराठी अस्मिता वगैरे बाळगणारी मी त्याच्या या वक्तव्याने थोडी दुखावलेच, पण जर नीट विचार केला तर त्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य नक्कीच आहे असं वाटलं. आज मराठी दैनिकांची/पाक्षिक/मासिकांची परिस्थिती, एखाद् दुसरा अपवाद सोडल्यास, फार काही कौतुक करण्यासारखी नक्कीच नाही.
मराठीमध्ये दर्जेदार लेखन व्हावे यासाठी बरेच प्रयत्न सुरु आहेत, नाही असे नाही पण ते प्रयत्न बाळसे धरताना दिसत नाहीत. यात काही हौशी मंडळींनी एकत्र येऊन हाती घेतलेले प्रकल्पही बरेच आहेत. याला ’थिंक-मराठी’सारखे अपवाद देखील आहेत पण अशा संकेतस्थळांचा प्रचार होताना दिसत नाही.
या सगळ्या परिस्थितीला एक सोयीस्कर उत्तर मिळते ते म्हणजे “आज जवळ-जवळ सगळेच इंग्रजी शिकत आहेत, तर मराठीसाठी हा खटाटोप कशाला, काही नवे, ’चांगले’ वाचायचे झाले तर आंतरराष्ट्रीय मासिके आहेतच ना!” हो अगदी बरोबर – आज आपण तथाकथित सुशिक्षित मराठी लोकं तेच करत आहोत. वाचूया ना, उगाच मराठी-मराठी करत बसण्यापेक्षा इंग्रजीच वाचत राहू आणि आपल्या संत परंपरेबद्दल- वारकरी संप्रदायाबद्दल – शिवाजी महाराजांबद्दल नॅशनल जिऑग्राफिकने किंवा मोअर इंटेलिजंट लाईफने ’स्पेशल इश्यु’ काढला कि जोरात “जय महाराष्ट्र” म्हणून मोकळे होऊ.
इंग्रजी वाचायला, त्याचं कौतुक करायला माझा विरोध नाही पण आपण काय वाचतो, त्याने आपण कोणत्या अर्थव्यवस्थेला मदत करतो त्याचे भान आपल्याला असले पाहिजे असं मला वाटतं. आज आपण आपल्या नकळत एका नव्या प्रकारच्या वैचारिक-साम्राज्यवादाचे बळी बनत चाललो आहोत. हा प्रश्न फक्त तुम्हाला वाचायला काय आवडते एवढ्या पुरता मर्यादित राहीला नसून तो अनेक स्तरांवर आर्थिक-सांस्कृतिक-राजकीय आव्हाने निर्माण करणारा आहे.
मराठीमध्ये लेखकांची कमी नाही, परंतु आत्ता त्या लेखनाला पूरक अशी व्यवस्था आपल्याकडे नाही, ती कशी निर्माण होईल याचा आपण वाचक म्हणून विचार करायला हवा. कारण फक्त आहे त्या परिस्थितीत फक्त नाके मुरडून नावे ठेऊन, बदल काहीच होणार नाही.

No comments:
Post a Comment