२०११ हे वर्ष गाजले जगभरात सुरु झालेल्या विविध आंदोलनांमुळे.
१७ डिसेंबर २०१० या दिवशी २६ वर्षीय मोहम्मद बुआझीझी या ट्युनिशियन तरुणाने पोलिस व नोकरशाहीच्या जाचाला कंटाळून भरचौकात स्वत:ला पेटवून घेतले. या सामान्य विक्रेत्याला अनेक वर्ष इथल्या पोलिसांनी विविध प्रकारे त्रास दिला होता. राजधानीपासून साधारण २०० किलोमिटर दूर झालेल्या या घटनेचे पडसाद ट्युनिशियाभर पसरले. या तरूणाचा मृत्यु देशभर अनेक सरकार विरोधी निदर्शनांना कारणीभूत ठरला व दोनच महिन्यात तिथल्या २३ वर्ष सत्तेत असलेल्या अबिदीनीला पाणउतार व्हावे लागले. ट्युनिशियामधील ही घटना ईजिप्तमधील ताहीरीर चौकातील निदर्शनांना कारणीभूत ठरली. त्याचबरोबर माद्रीद, लंडन, तेल अव्हीव्ह, न्युयॉर्क, मॉस्को या शहरांमधल्या अनेक उठावांना ट्युनिशियामधील ही ठिणगी पुरेशी होती.
अमेरिका, ब्रिटन सारख्या विकसित देशांना आर्थिक मंदीच्या झळा बसत होत्या. ओबामांनी दाखवलेलं बदलाचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याची काहीच शक्यता दिसत नव्हती. आर्थिक भरभराटीच्या काळात हे देश आपल्या जनतेला आनंदी ठेऊ शकले होते. पण न संपणारी आर्थिक मंदी आणि त्याचा नोकर्यांवर होणारा परिणाम, यामुळे इथल्या तरुणांनाही या धुंदीतून बाहेर पडावे लागले. आपल्या अस्वस्थतेला सोशल नेटवर्कस् वर वाचा फोडत त्यांनी आपल्याच सारख्या ९९% लोकांना शोधले. अमेरिकेच्या परिस्थितीला जबाबदार १% ना जाब विचारायला ते गेल्याच महिन्यात वॉल स्ट्रीटवर ठाण मांडून बसले.
या सर्व विरोधकांमधे कमालीचे साधर्म्य होते. सगळीकडेच सुशिक्षित मध्यमवर्गीय तरूणांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा निदान दृष्य स्वरुपात पाठींबा नव्हता. सर्वच आंदोलकांचा ठाम विश्वास आहे की त्यांच्या देशातली राजकीय व आर्थिक व्यवस्था त्यांच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी असमर्थ आहे. या परिस्थितीला त्यांच्याकडे उत्तर नाही, पण काय हवे हे जरी माहीत नसले तरी काय नको हे मात्र पक्के माहित आहे. या सर्व विरोधकांनी समदु:खींना एकत्र करण्यासाठी नव्या माध्यमांचा वापर केला. जगभरातल्या अभ्यासकांकडून या तरूणांवर एकच टीका होते आहे, ती म्हणजे यांना कोणतीही वैचारिक धाटणी नाही व एकाही कृतीकार्यक्रमाची जोड नाही. परंतु या विरोधकांच्या मते अशी कोणतीही धाटणी नसणे हेच त्यांचे वैशिष्ठ्य आणि त्यांना मिळणार्या प्रतिसादाचे कारण आहे.
भारतामधेही २०११ मधे अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आले. या सर्व भ्रष्टाचाराला उत्तर म्हणून गेली ४३ वर्षे संसदेत पडून असलेले लोकपाल विधेयक काही बदलांसकट मंजूर व्हावे म्हणून अण्णा हजारे यांनी उपोषण केले. या उपोषणामुळे व सरकार या विरोधाला उत्तर शोधण्यात कुचकामी ठरल्यामुळे बरेच लोक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात वेगवेगळ्या पध्दतीने सामील झाले. परंतु या आंदोलनात तरूणाई लोटली व त्यांच्या असंतोषाला वाचा फुटली हे माध्यमांनी वारंवार वापरलेले विधान मात्र फसवे वाटते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विरोधकांमधे तरूण जरी मोठ्या संख्येने असला तरी हा तरूण सर्व आर्थिक-सामाजिक स्तरांचे प्रतिनिधीत्व करणारा नक्कीच नव्हता. शहरी-सुशिक्षित-मध्यमवर्गीय तरुण, जो आधुनिक संपर्क साधनांपर्यंत पोहचू शकत होता तोच फक्त सहभागी होताना दिसला. ग्रामीण तरूण अगदी तुरळक प्रमाणात तर आदिवासी भागातील तरूणाचा सहभाग जवळजवळ शून्य होता. हा सहभागही शाश्वत कृती शिवाय फक्त सोशल नेटवर्किंगवर टीका टीपण्णी करणे अशा अतिशय मर्यादित स्वरुपाचा होता. कधीकधी मेणबत्ती किंवा एखाद्या धरण आंदोलनात नारे देणे ही जनसहभागाची प्रथम आणि द्वितीय पायरीच आहे. त्यामुळे आपण केवळ १% ते २% लोकांच्या प्रतिसादालाच सहभाग समजून त्याला जनसागर वगैरे म्हणण्याची घाई करत आहोत. इतर आंदोलनांमधे व सार्वजनिक जीवनात कृतीशील असा तरूण मात्र काही काळानंतर यापासून दूर झाला ही बाब लक्षणीय वाटते.
लोकपाल विधेयकासाठीचे आंदोलन हे व्यवस्थेमधल्या बदलांसाठीचे आंदोलन आहे. अशा आंदोलनांना लोकाभिमुख बनविण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांमधून त्यामधे सहभाग हवा. असा सहभाग मिळविण्यासाठी आंदोलनाला कृतीची जोड हवी. भारतातल्या या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची रचना अशी कृती देण्यात असमर्थ ठरली. किंबहूना, हे आंदोलन सर्व समावेशक बनावे यासाठी रचनाच केली गेलीली दिसली नाही. यामुळेच खूप मोठ्या वर्गाला आपण आंदोलनात सहभागी व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे हे माहित नाही. त्याचा सहभाग प्रत्यक्ष कृतीला जोडून नाही, त्यामुळे त्या विषयाला तो बांधिल नाही. त्यामुळे काही प्रतिकात्मक कृतींनंतर हा तरूण जो याकडे काही उत्तरांची अपेक्षा ठेवत होता तोही यापासून दुरावला.
जगभरात चालू असलेल्या आंदोलनांमधून नागरी प्रश्नावर काम करणार्या काही छोट्या कृतीगटांनी मात्र या आंदोलनातून प्रेरणा घेतली आहे. पण, त्यामधे सहभागी व्हायला शहरी तरुणांना वेळ मिळत नाहीये. एखाद्या संध्याकाळी मित्र-मैत्रिणी मिळून नारे देणं त्यांना जास्त सोईचं वाटतं. खरंतर जगभरात चाललेली ही लढाई याच चंगळवादी आणि बेफीकीर प्रवृत्तीच्या विरोधात आहे. म्हणूनच याच वृत्तीतून आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद हा फसवा व निष्फळ वाटतो.
भ्रष्टाचाराची खरी झळ पोचलेला, नागरी सुविधांपासून वंचित असलेल्यांचा सहभाग या आंदोलनात फार कमी आहे. त्यामुळे यातून नवं नेतृत्व उभं राहून, याला योग्य दिशा देऊन एखादी शाश्वत कृती निर्माण होण्याची शक्यता फार कमी वाटते. यामूळेच सहभागाच्या पहिल्या दुसर्या पायरीवरचा तरूणही यातून तुटला जाईल याची भीती वाटते. याला उत्तर म्हणजे आपल्या भागात काम करत असलेल्या अशा छोट्या गटांना बळ देणं आणि जर कोणी काम करत नसेल तर असा गट उभा करणे हेच आहे. जर आपण या तरूणांच्या उत्साहाला कृतीची जोड देऊ शकलो तर यातून मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पण जर हि ठिणगी आपण अतिउत्साहाच्या भरात विझू दिली तर आपल्याला व्यवस्थेमधील बदलांसाठी आणखीनही मोठ्या घोटाळ्यांची वाट बघत बसावे लागेल.